Rohini Khadse | विरोधी नेत्यांना टार्गेट केले जात आहे- रोहिणी खडसे

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होते हे आता सर्व राज्याला माहिती आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.खराडी ड्रग्ज पार्टीप्रकरणी पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली आहे. याची सर्वत्र चर्चा सुरु असताना रोहिणी खडसे यांनी शनिवारी (दि.२) राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.पक्ष संघटनेबाबत काही नियुक्त्या करण्याबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचे त्यांनी भेटीनंतर स्पष्ट केले. अन्य प्रकरणांवर सविस्तरपणे भाष्य करणे त्यांनी टाळले.
त्या म्हणाल्या, पतीला भेटण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. एक वकील म्हणून त्यांना भेटले. कोर्टात दुसऱ्या दिवशी हजर व्हायचे होते आणि त्यांच्याकडून काही माहिती हवी असल्याने त्यांची भेट घेतली. त्यानंतर कार्यालयात पोलीस आयुक्त अमितेश कुमार असल्याने त्यांचीही भेट घेतली. पुणे पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. आता हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर काही बोलणार नाही. योग्य वेळी, योग्य ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करेन. रूपाली चाकणकरांच्या टिकेबाबतही रोहिणी खडसे म्हणाल्या, त्यांना टीका करायची असेल तर करू द्या. योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देऊ. पाळत ठेवण्याचा हेतू नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.





