करोनानंतर भारतासाठी शाश्वत विकासाची संधी : अॅड. वंदना चव्हाण

पुणे – “हवामान बदल हा केवळ पर्यावरणाशी संबंधीत प्रश्न राहिला नसून सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक विकासाच्या दृष्टीनेदेखील तो महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. करोनानंतर हळूहळू सर्व बाबी पूर्वपदावर येत असताना शाश्वत विकासाची संधी भारतासाठी निर्माण झाली आहे. याचा उपयोग करून भारतानेदेखील इतर देशांप्रमाणे हरित, स्वच्छ व आरोग्यदायी आर्थिक विकासाकडे वाटचाल करावी,’ असे वक्तव्य राज्यसभा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या ईईसीसी गटाच्या वतीने आयोजित “एनर्जी, एनव्हायर्नमेंट ऍण्ड इकोनॉमिक ग्रोथ : इमर्जिंग चॅलेन्जेस’ या ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, परिषदेचे संयोजक आणि पीआयसीचे विश्वस्त अमिताभ मल्लिक आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाल्या, “कोळसा खाणी आणि इतर मोठ्या प्रकल्पांना लगेचच मिळणारा एन्व्हार्नमेंटल क्लिअरन्स पाहता शाश्वत विकासाच्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत का, ही शंका मनात येते. अजूनही आपण हवामान बदल आणि शाश्वत पर्यावरणीय विकास याकडे दुर्लक्ष करीत आहोत. एकट्या भारतात पर्यावरण बदलाने उद्भविणाऱ्या संकटांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
देशातील निम्मी लोकसंख्या ही याद्वारे निर्माण होणाऱ्या संकटांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सामना करते, यावरून हवामान बदल आणि संबंधीत विषयांचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल. यावर काम करायचे असेल तर करोनानंतर सुरुवातीपासूनच शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सरकारने जीडीपीवर होणाऱ्या परिणामाला न जुमानता शाश्वत विकासाला महत्त्व द्यायला हवे, याशिवाय कार्बन उत्सर्जन कमी केल्याने जीडीपी कमी होतो ही समजूत विसरायला हवी.’





