सत्तेसाठी हापलेले विरोधक केवळ इंडियाचीच गोष्ट करणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – जयप्रकाश नारायण यांनी सांगितलेल्या विचारावर चालणारे हे लोक नाहीत. सत्तेसाठी हापलेले हे विरोधकांचे पक्ष केवळ इंडियाचीच गोष्ट करणार आहेत. आता मात्र, इंडिया विरुद्ध भारत अशी लढाई सुरु होणार आहे. त्यानंतर भारतच आगामी निवडणुकांमध्ये जिंकेल, असा विश्वास भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या या गटाला यूपीए ऐवजी आता इंडिया हे नाव देण्यात आले आहे. मात्र, याच नावांवरुन पावसाळी अधिवेशनासाठी आल्यानंतर विधानभवनात प्रसार माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, इंडिया या नावावरुन मला जयप्रकाश नारायण यांच्या विचारांची आठवण झाली आहे. ते म्हणायचे की, इंडिया हा उच्चभ्रू लोकांचा देश आहे. तर भारत हा मजूर, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा देश आहे. भारत म्हणजे आपला धर्म, आपली संस्कृती जपणाऱ्यांचा देश.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही जगभर फिरून आपल्या धर्माचा, संस्कृतीचा प्रचार प्रसार करीत आहेत. नरेंद्र मोदी हे जगभर फिरून आपली संस्कृती जगभर पसरवत आहेत. यासोबतच आपल्या देशाला आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.
तर राहुल गांधी हे विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी होईल असे वक्तव्य करतात. त्यांनी आता विरोधकांच्या गटाला इंडिया हे नाव देऊन त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडविले आहे.





