Operation Sindoor – ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन (मानवरहित हवाई यंत्र) उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. ही बंदी ३ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशानुसार, काही असामाजिक तत्वांकडून ड्रोनचा वापर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्यासाठी किंवा संवेदनशील तसेच पर्यटन स्थळांची रेकी करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अप्रिय घटनेला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.