Operation Sindoor – पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने देखील भारतावर अनेक क्षेपणास्त्रे डागली. मात्र भारताने ती हल्ल्यापूर्वीच नष्ट केली. 7 आणि 8 मे रोजी रात्री देशातील अनेक प्रमुख शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. यात अमृतसर येथील सुवर्ण मंदिरही पाकिस्तानच्या निशाण्यावर होते. मात्र, भारतीय सेनेने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जीओसी 15 इंफ्रेंट्रीचे मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी पाकिस्तानची ही नापाक कारवाई सर्वांसमोर उघड केली आहे. पाकिस्तान लष्कराने अमृतसर सुवर्ण मंदिरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. महत्त्वाच्या धार्मिक स्थळांसोबतच पाकिस्तानने सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, असेही शेषाद्री म्हणाले. मेजर जनरल कार्तिक म्हणाले, पाकिस्तानने हवाई हल्ले वाढवले होते. ड्रोन सोबतच त्यांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. पण, आम्ही पूर्णपणे तयारीत होतो. त्यामुळेच आम्ही त्यांचा प्रत्येक हल्ला फोल ठरवला. पाकिस्तानने सुवर्ण मंदिरालाही लक्ष्य करत मिसाइल तसेच ड्रोन हल्ला केला. पण, आम्ही त्यांचे हे मनसुबे उधळून लावले. अमृतसर सोबतच पाकिस्तानने जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, जालंधर, लुधियाना, चंदीगड तसेच भूज या शहरांवरही हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांमध्ये भारतीय सेनेच्या आकाश मिसाइल सिस्टीम आणि एल – 70 या डिफेन्स गनने महत्त्वाची भूमिका निभावली. वास्तविक, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले होते. मात्र, यात दहशतवाद्यांच्या बाजूने पाकिस्तानी लष्कर उतरले आणि त्यांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर देत त्यांचे बरेच नुकसान केले.