“आम्ही पाकची F-16 अन् JF-17 लढाऊ विमाने बेचिराख केली” ; ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा

Operation Sindoor । ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला, परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ खोटे बोलत भारताची कारवाई पूर्णपणे फेटाळून लावत असतात. मात्र आता भारतीय हवाई दल प्रमुख एपी सिंह यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे, सिंह यांनी,”भारतीय सैन्याने ४-५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली असून या कारवाईदरम्यान पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली असल्याचे म्हटले आहे.
हवाई दल प्रमुख एपी सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरविषयी खुलासा केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याविषयी बोलताना त्यांनी,” “पहलगाम हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली. ऑपरेशन सिंदूर इतिहासात लक्षात राहील. आम्ही ३-४ दिवसांत युद्ध पूर्ण केले. युद्ध कसे संपवायचे हे जगाने भारताकडून शिकले पाहिजे. आम्ही पाकिस्तानी हद्दीत २०० किलोमीटर आत मारा केला. आमची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे अत्यंत अचूक आणि अभेद्य होती. या काळात, पाकिस्तानची नागरी लोकसंख्या सुरक्षित होती.”असा दावा देखील त्यांनी केला आहे.
पाकिस्तानचे किती नुकसान झाले? Operation Sindoor ।
तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानीबद्दल एपी सिंह यांनी माहिती दिली. याविषयी बोलताना, “आमच्या सैन्याने ४-५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली, ज्यात एकF-16 अन् JF-17 लढाऊ विमानांचा समावेश आहे. गुप्तचर अहवालांनुसार, “आम्ही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र यंत्रणेचेही नुकसान केले. चार रडार सिस्टीम, दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि मोठ्या प्रमाणात एअरफील्डचे नुकसान झाले. त्यांच्या हँगरमध्ये उभे असलेले सी-१३० विमानही उद्ध्वस्त झाले.” असा मोठा खुलासा यावेळी त्यांनी केला.
पाकिस्तान परीकथांसारखा विचार करतो
पुढे पाकिस्तानविषयी बोलताना त्यांनी, “ऑपरेशन सिंदूर द्वारे आम्हाला हवाई शक्तीबद्दल आणि आपण किती दूरपर्यंत प्रहार करू शकतो हे शिकायला मिळाले. हवाई शक्तीची प्रासंगिकता राखली पाहिजे. मी आमच्या सर्व देशवासीयांना वचन देतो की जेव्हा जेव्हा भारतीय हवाई दलाची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही आमची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू. जर त्यांना (पाकिस्तानला) वाटत असेल की त्यांनी आमची १५ लढाऊ विमाने पाडली आहेत, तर त्यांना तसे विचार करू द्या. पुढच्या वेळी जेव्हा ते आमच्याशी लढायला येतील तेव्हा ते असा विचार करतील की त्यांच्याकडे १५ कमी लढाऊ विमाने आहेत. त्यांची विचारसरणी परीकथांसारखी आहे.”असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली.
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर दिले. लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या कारवाईदरम्यान १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. जेव्हा पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप केला तेव्हा त्यांनाही योग्य उत्तर देण्यात आले.





