भाजपने ‘आप’ला चिरडण्यासाठी ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले; केजरीवालांचा थेट आरोप

arvind kejriwal | narendra modi – मोदी आणि भाजपने ‘आप’ला चिरडण्यासाठी ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले आहे, आम आदमी पक्षाच्या सर्व महत्वाच्या नेत्यांना तुरूंगात टाकण्याची त्यांची योजना आहे.
आमच्यापक्षाचे बँक खाती गोठवून आम्हाला पक्षाच्या कार्यालयातूनही बाहेर काढण्याची त्यांची योजना आहे असा आरोप या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्यापुर्वी त्यांनी आप मुख्यालयात पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते.
केजरीवाल म्हणाले की आम आदमी पक्षाने दोन राज्यांमध्ये सत्तेवर आल्यानंतर लोकहिताच्या अनेक योजना राबवल्या. सरकारी शाळा, रूग्णालयांची सुधारणा केली. लोकांना वीज आणि पाणी मोफत दिले एवढे सगळे करूनही आम्ही सरकारचा पैसा वाचवले.
असा कारभार आपल्याला करता येत नाही म्हणून मोदी आम आदमी पक्षालाच संपवायला निघाले आहेत असे केजरीवालांनी नमूद केले. पण या अत्याचाराच्या विरोधात आम्ही अधिक सक्षमपणे संघर्ष करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आम्ही मोठे होऊ नये आणि भाजपसाठी आव्हान बनू नये म्हणून भाजपने ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन झाडू’च्या माध्यमातून ‘आप’च्या बड्या नेत्यांना अटक केली जाईल असे ते म्हणाले.
सार्वत्रिक निवडणुका संपल्यानंतर आप नेत्यांची बँक खाती गोठवण्याचा कट भाजप रचत आहे. ईडीच्या वकिलांनी कोर्टात हे विधान आधीच केले आहे की निवडणुकीनंतर लवकरच आपची बँक खाती गोठवली जातील.
भाजपने खोटे गुन्हे दाखल करून आप नेत्यांना अटक केली, त्यांच्याकडे गैरव्यवहाराचा एक रूपयाही सापडलेला नाही. मी २०१५ मध्ये सत्तेत आल्यापासून, त्यांनी किती आरोप केले? आता ते म्हणतात की दारू धोरण घोटाळा झाला आहे,
लोक त्यांना विचारत आहेत की घोटाळा झाला तर त्याचा पैसा कुठे आहे. इतर ठिकाणी, जेव्हा छापे पडतात त्यावेळी, नोटा आणि सोने जप्त केले जाते, परंतु येथे तसे काहीच घडलेले नाही. सर्व पैसे कुठे आहेत, असा सवाल त्यांनी केला.





