कॅंटोन्मेंट हद्दीतील घरांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

घरांच्या दुरुस्तीला बोर्डाच्या परवानगीची गरज नाही
देहुरोड – केंद्रीय संरक्षण मंत्रायलयाने रक्षा संपदा विभागास दिलेल्या आदेशानुसार आता कॅंटोन्मेंट हद्दीतील नागरिकांना त्यांच्या घरांची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॅंटोन्मेंट हद्दीतील नागरिकांना घरांच्या दुरूस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सुमारे 90 टक्के भाग देहुरोड दारूगोळा कोठाराच्या संरक्षित प्रतिबंधित क्षेत्राने (रेडझोन) बाधित असल्याने येथील घरांना दुरुस्ती परवानगीबाबत आदेशात स्पष्ट सूचना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
संरक्षण मंत्रालयातील उपसंचालक राजेश कुमार यांनी मंगळवारी (दि. 10) रक्षा संपदा विभागाच्या महासंचालकांना एक पत्र पाठविले असून, त्यानुसार कॅंटोन्मेंट हद्दीतील घरांची दुरुस्ती करण्यासाठी बोर्ड प्रशासनाची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही.
या पत्रात संबंधितांना दिलेल्या सूचनेनुसार घरांच्या अंतर्गत भिंती दुरुस्ती करणे, जिने दुरुस्ती करणे, भिंतीचा कोसळलेल्या भागाची डागडुजी करणे, सीमा भिंत दुरुस्ती, जुन्या मोजमापात बदल न करता घराचे छत दुरुस्ती करणे, सिमेंट गिलाव्यासह किरकोळ दुरुस्ती कामे, रंगकाम करणे, वातानुकूलन यंत्रणा बसविणे, प्रकाश व्यवस्था व सजावट करणे, घरातील मोकळ्या हवेसाठी दरवाजे व खिडक्या बदलणे, पाण्याची टाकी, सोलर बसविणेसाठी बोर्डाकरून परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. मात्र जुन्या घरांचा पुनर्विकास करणेसाठी कॅंटोन्मेंट कायद्यातील तरतुदीनुसार रीतसर परवानगी घ्यावी लागणार असल्याचे नमूद केले आहे.





