पुणे – राज्य सरकारने “ब्रेक द चेन’ अंतर्गत व्यावसाय, हॉटेल, मॉल आणि विविध आस्थापनांना सवलत दिली आहे. याच धर्तीवर धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे या वकील संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे करण्यात आली आहे. अध्यक्ष ऍड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, उपाध्यक्ष ऍड. मोहन फडणीस, सचिव ऍड. सुनिल मोरे आणि खजिनदार ऍड. रजनी उकरंडे यांनी ही मागणी केली आहे.
सध्या अनेकांचे मानसिक स्वास्थ हरवले आहे. यामुळे तर काहींनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपविले आहे. अशा परिस्थितीत श्रध्दाळू लोकांना मंदिरातून दर्शनाने सकारात्मक उर्जा मिळत असते. मात्र, मंदिर बंद आहेत. त्यामुळे मंदिरे सुरू करण्याबाबतचा विचार करायला हवा. मद्य, मांसविक्री सुरू असताना मंदिरेच का बंद, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मोठी देवस्थाने उघडल्यास गर्दी होईल, असे अशी भीती वाटत असेल, तर ऑनलाईन वेळ ठरवून भाविकांना प्रवेश द्यावा. जेथे गर्दी होणार नाही, ती देवस्थाने पूर्णपणे खुली करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.