Diesel Shortage : महाराष्ट्र हळहळला! डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका नाकारली अन् घडली मोठी दुर्घटना
Diesel Shortage : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात एका गरोदर महिलेला डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Diesel Shortage : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात एका गरोदर महिलेला डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने संबंधित महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून, या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संबंधित गरोदर महिलेला उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी तिला हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याची गरज असताना, रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण देत सेवा नाकारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
यानंतर नातेवाईकांनी स्वतः पैसे जमवून खासगी वाहनाची व्यवस्था केली. “आम्ही ८५० रुपयांचे डिझेल टाकून खासगी गाडी केली आणि महिलेला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, वेळेत रुग्णालयात आणले असते तर बाळ वाचू शकले असते,” अशी व्यथा महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
“आम्ही तातडीने निघण्यास तयार होतो; मात्र रुग्णवाहिकेत डिझेल नसल्यामुळे ती उपलब्ध झाली नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करताना, “सरकारकडून कुठेही इंधनटंचाई नसल्याचे दावे केले जातात. मात्र, हिंगोलीमध्ये रुग्णवाहिकेला इंधन न मिळाल्यामुळे एका मातेला तिचे बाळ गमवावे लागले. या मृत्यूस सरकार जबाबदार आहे,” असा आरोप केला.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, रुग्णवाहिका सेवा आणि आपत्कालीन आरोग्य सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





