Sanjay Raut : संजय दिना पाटलांना ओपन चॅलेंज; राऊत आक्रमक, म्हणाले “मुलीच्या उमेदवारीवरुन त्यांनी तमाशा…”
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी संजय दिना पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याला ओपन चॅलेंज दिले.

Sanjay Raut : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधकांवर टीकेचा भडिमार केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका करत आक्रमक भाष्य केले होते.
“माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटल किंवा स्मशानात जावे लागेल. आमच्याकडे सर्व व्यवस्था असते,” असं वक्तव्य करत त्यांनी हाताने बंदुकीची अॅक्शन करत विरोधकांना इशाराही दिला होता.
या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी संजय दिना पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याला ओपन चॅलेंज देत “चल मी तुझ्या नादाला लागतो, बंदूक दाखवू नको. गद्दारी करून 50 कोटी गिळलेत ना, मग गप्प बस,” अशा शब्दांत ओपन चॅलेंज दिले.
नेमकं काय म्हणाले होते संजय दिना पाटील?
“मी उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारकी किंवा खासदारकीसाठी कधीच गेलो नाही. त्यांनीच मातोश्रीवर बोलावून मला तिकीट दिले. माझ्या मुलीसाठीही मी तिकीट मागितले नव्हते. ती जागा मनसेला जाऊ नये म्हणून माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधण्यात आला.” तसेच ते असंही म्हणाले की, “माझं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी कोणतंही वैर नाही, त्यांच्यामुळे मी खासदार झालो आहे. पण कोणी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांनी स्वत:चा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा. माझ्या नादाला लागाल तर एकतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात जाल.”
संजय दिना पाटील यांनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी जोरदार पलटवार करत, “संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडण्यापूर्वी मातोश्रीवर चर्चा करायला हवी होती. ते मिंध्येंच्या गटात गेल्यानंतर खोटे बोलत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुलीच्या उमेदवारीसाठी त्यांनी मोठा दबाव आणला होता.
मुलीच्या उमेदवारीवरुन संजय दिना पाटील म्हणाले….
“उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलीला महानगरपालिका निवडणुकीत तिकीट दिलं. पण माझी मुलगी किंवा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे तिकीट मागायला गेलो नव्हतो. ती जागा मनसेला जाऊ नये म्हणून राजुल पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली. राजुल पाटील या माझं मतदारसंघातील काम बघत होत्या, नगरसेवकपदाच्या निवडणुकीत उभं राहायची त्यांची कोणतीही इच्छा नव्हती. मात्र, ही जागा शिवसेनेची असल्याने ती मनसेला जाऊ नये या एका कारणासाठी माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन ठाकरे गटाने ती जागा आपल्याकडे घेतील.”
संजय राऊतांनी अंतर्गत घडामोड सांगितली
“संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपली मुलगी राजुल पाटील हिला उमदेवारी मिळावी, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुलीच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटील यांनी खूप तमाशा घातला होता. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो, असे बोलण्यापर्यंत संजय पाटील यांची मजल गेली होती.” असं संजय राऊत यांनी सांगितलं.







