केवळ अडीच हजारांत दिला जात होता करोना निगेटिव्हचा अहवाल

मेरठ- भ्रष्टाचार आपल्या देशात किती बोकाळला आहे आणि त्याने यंत्रणा किती सडलेली आहे, याचा आणखी एक संतापजनक प्रकार नव्याने उघड झाला आहे. सध्या जगात करोना महामारीने भितीचे वातावरण आहे. माणसे मरत आहेत. मात्र त्यातही काही लोकांना धंद्याची संधी दिसते आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे करोना लागण झाली नसल्याचा अहवाल देण्याचा धंदाच एकाने सुरू केला होता. विशेष म्हणजे केवळ अडीच हजार रूपयांत करोना निगेटिव्ह असल्याचा हा अहवाल दिला जात होता. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शासन झोपेतून जागे झाले आणि अखेर हा काळा धंदा बंद झाला.
या प्रकरणी येथील हापूड रस्त्यावरील न्यू मेरठ हॉस्पिटलच्या व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाह आलम हे त्याचे नाव असून हॉस्पिटलच सील करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. नक्की कधीपासून हा बनाव सुरू होता, ते सांगता आले नसले तरी आतापर्यंत 19 जणांना करोना निगेटिव्ह अहवाल देण्यात आले असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. केवळ अडीच हजार रूपयांत आपण असा अहवाल तयार करून देउ. त्यावर शासकीय रूग्णालयाची मोहोर असेल. रिपोर्ट अगदी अस्सल असेल व कोणीही त्याबद्दल शंका घेउ शकणार नाही, असे शाह आलम याने एका व्यक्तीला सांगितले होते.
या व्यक्तीला हा गोलमाल रूचला नाही व त्याने याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला. आता त्याची पाळेमुळे खणली जात असून या गंभीर प्रकरणात सरकारीसोबतच काही खासगी हॉस्पिटल्सचाही समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोग्य विभागाचीही यामुळे झोप उडाली आहे. एखाद्या पॉझिटिव्ह रूग्णाला या भुरट्यांनी निगेटिव्हचा अहवाल दिला असेल आणि तो खुलेआम करोनाचा प्रसार करत फिरला असेल तर पुढे काय, हा प्रश्न या प्रकारामुळे समोर आला आहे.





