‘लालूजींना आज शिवीगाळ करणारेच भविष्यात त्यांना भारतरत्न देतील’; तेजस्वी यादवांच्या विधानावर जोरदार टीका

पाटणा – आरक्षण लागू केल्याबद्दल कर्पूरी ठाकूर यांच्यावर टीका करणाऱ्यांनीच त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. जे आज लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका करत आहेत. भविष्यात तेच त्यांचा सन्मान करतील असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला. लालूजींना आज शिवीगाळ करणारेच भविष्यात त्यांना भारतरत्न देतील असे त्यांनी म्हटले आहे.
सीतामढीच्या सोनबरसा ब्लॉकमध्ये आयोजित कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी वडील लालू प्रसाद यादव यांची तुलना कर्पूरी ठाकूर यांच्याशी केली. ते म्हणाले की, एक दिवस लालू प्रसाद यादव यांनाही भारतरत्न मिळेल आणि हा भारतरत्न तेच लोक देतील जे आज त्यांना शिव्या देत आहेत.
तेजस्वी यादव यांच्या या विधानानंतर भाजप आणि संयुक्त जनता दल अर्थात जेडीयूने राष्ट्रीय जनता दलाविरूध्द आघाडी उघडली आहे. जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले की, तेजस्वी यादव यांचे विधान आश्चर्यकारक आहे. चारा घोटाळ्यातील एखाद्या दोषीला भारतरत्न मिळेल ही अपेक्षा हास्यास्पद आहे. कुप्रसिद्ध घोटाळ्यातील कोणत्याही आरोपीला कधी भारतरत्न मिळाला आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.
Sitamarhi, Bihar: On CM Nitish Kumar ‘Pragati Yatra’, RJD leader Tejashwi Yadav says, “Yeh pragati yatra nahi hai, durgati yatra hai…” pic.twitter.com/UjVRMZPO00
— IANS (@ians_india) February 17, 2025
तेजस्वींच्या विधानावर बिहार सरकारचे मंत्री आणि भाजप नेते कृष्णानंद पासवान म्हणाले की, जर तेजस्वी एक परिपक्व नेते असते तर त्यांनी असे म्हटले नसते, त्यांना लाज वाटत नाही का? लालू प्रसाद यादव हे जगातील सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत. बिहारची तिजोरी लुटली गेली. बिहारमध्ये अपहरण उद्योग सुरू होता. अशा घोटाळेबाजाला भारतरत्न पदवी मागणे हे राजकारणात लाजिरवाणे आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री दिलीप जयस्वाल यांनी तेजस्वी यादव यांच्या विधानावर म्हटले आहे की, काही लोकांना दिवास्वप्न पाहण्याची आणि निरर्थक बोलण्याची सवय असते. भारतरत्न मिळण्यासाठी एक वेगळीच प्रतिष्ठा असावी लागते, दोषी व्यक्तीला भारतरत्न मिळू शकते का?
तेजस्वी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राजद खासदार मनोज झा म्हणाले की, १९७७ ते ७८ दरम्यान आरक्षण वाढवण्याचे काम कोणी केले, कर्पूरी ठाकूर यांना शिवीगाळ करणारे कोण होते, त्यांना खुर्ची सोडण्यास सांगितले गेले. त्यांच्याविरोधात बोलणारे कोण होते, ते भाजपचे होते. अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अनादराने घेतले, कर्पूरी जी नंतर लालूजी नसते तर काय झाले असते. १९८० मध्ये भाजपचे जे स्वरूप होते ते आज आहे का?




