विठ्ठल मंदिरात केवळ केसीआर यांनाच VIP दर्शनाची परवानगी; मंदिर प्रशासनाने सांगितले यामागचं कारण

पंढरपूर – भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आषाढी वारीचे औचित्य साधून संपूर्ण मंत्रिमंडळासह 600 गाड्यांचा ताफा घेऊन हैदराबादहून सायंकाळी सोलापूरला पोहोचले. ते आज (मंगळवारी) विठुरायाचे दर्शन घेणार असून पंढरपूर येथे शेतकरी मेळावा घेत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. के. चंद्रशेखर राव हे सोमवारी दुपारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आमदार आणि खासदारांसह हैद्राबादच्या प्रगती भवनातून सोलापूरला निघाल्यानंतर वाटेत त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सायंकाळी के. चंद्रशेखर राव आणि त्यांचा ताफा सोलापुरात पोहोचला. या सर्वांसाठी सोलापुरात मुक्कामासाठी विविध हॉटेल्समध्ये 225 खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापुरातील मुक्कामानंतर ते आज पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. मात्र केवळ केसीआर यांनाच विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व मंत्री आणि इतर जणांना रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. परंतु फक्त केसीआर यांना दर्शनाची परवानगी का देण्यात आली. याबाबत मंदिर प्रशासनाने खुलासा केला आहे.
आषाढी वारीनिमित्त हजारो वारकरी पंढरपुरात पायी चालत येतात, त्यांच्या दर्शनामध्ये अडचण नको म्हणून व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आज पंढरपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर बीआरएसचा शेतकरी मेळावा देखील होणार आहे. याच शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय केसीआर हे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिराचेही दर्शन घेणार आहेत.
विमानातून पुष्पृवृष्टी नाकारली
श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वाखरी येथे होणाऱ्या पालखी सोहळ्यावर विमानातून पुष्पुष्टी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर विमानतळावर केसीआर यांचे विमान येऊन थांबले आहे. परंतु प्रशासनाने विमानातून पुष्पवृष्टी करण्यास परवानगी नाकारली आहे.





