Nagar | सर्व्हर यंत्रणा डाऊनमुळे अवघे ४५ टक्के धान्य वाटप

शेवगाव, (प्रतिनिधी) – सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सरकारमान्य धान्य दुकानातून धान्य देण्यास राज्यभर सध्या पॉस मशिनचा उपयोग करणे सुरू झाले. मात्र, पॉस मशीन सर्व्हर यंत्रणा वारंवार विस्कळीत होण्याचे प्रकार घडत असल्याने राज्यभर गोरगरीब लाभार्थींना धान्य मिळणे जिकरीचे ठरले आहे.
एकट्या शेवगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यात पॉस मशिनच्या व्यत्ययामुळे अवघे ४५ टक्के धान्याचे वाटप होऊ शकले. गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांना त्यांचे हक्काचे मोफत धान्य त्वरित देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे तसेच वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रीतम गर्जे यांनी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे .
शेवगाव तालुक्यात ९ हजार ७५७ अंत्योदय कार्डधारक तर ३८ हजार ६६४ प्राधान्य कार्डधारकांची संख्या आहे. अंत्योदय कार्डधारकाला महिन्याला १५ किलो गहू व २० किलो तांदूळ, असे प्रत्येकी ३५ किलो धान्य मोफत मिळते.
प्राधान्य कार्डधारकांना माणसी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ मोफत दिला जातो. अलीकडे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सरकारमान्य धान्य दुकान सुरू असलेले धान्य वितरण सर्व्हर प्रणालीत बिघाड होत असल्याने वितरण व्यवस्था अत्यंत विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लाभार्थीबरोबरच दुकानदार देखील त्रस्त झाले आहेत.
सकाळी दुकान उघडले की दोन ते चार कार्डधारकांना धान्य दिले की, मध्येच सर्व्हर डाऊन होते. तासनतास वाट पाहत सर्वांनाच तिष्ठत रहावे लागते.
रेशन दुकानदारांना धान्य वितरणाबरोबरच लाभार्थी शिधापत्रिकाधारकांच्या प्रत्येक सदस्याची ई-केवायसी करण्यासारखी अन्य कामेही असतात. यावर लवकर मार्ग काढणे गरजेचे असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मीना कळकुंबे तसेच तालुकाध्यक्ष पोपट पाखरे यांनी सांगितले.




