नगर -करोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने मागील चार महिन्यांपासून महापालिकेची एकही सभा होऊ शकली नाही. त्यामुळे एकाही नवीन कामास मंजुरी मिळालेली नाही. अनेक नगरसेवकांनी ऑनलाइन सभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता मंगळवारी (दि.21) महापालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा दुपारी 1 वाजता होणार आहे.
तसा नगरसचिवांनी आदेश काढला आहे. यावेळी इतिवृत्तासह 23 विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मागील चार महिन्यांपासून महापालिकेतील एकही महत्त्वाची सभा झाली नाही. त्यामुळे शहरातील अनेक विकासकामे मंजुरी अभावी ठप्प आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी ऑनलाइन सभा घेण्याची मागणी केली होती.
राज्य शासनानेही 3 जुलैला आदेश काढून सर्व महापालिकांना ऑनलाइन सभा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार अहमदनगर महापालिकेची स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घेण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकाने लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार राज्य सरकारनेही काही निर्देश देऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. मागील चार महिन्यांपासून महापालिकेची एकही सभा झालेली नाही. त्यामुळे अनेक विकासकामे, त्यांच्या मंजुऱ्या घेणे बाकी होते.
महापालिकेचा अर्थसंकल्पही करोनामुळे महासभेकडून मंजूर झालेला नाही. राज्य सरकाने ऑनलाइन सभा घेण्यास मंजुरी दिल्याने महापालिकेतून सर्वसाधारण सभा व स्थायी समितीची ऑनलाइन सभा बोलावण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना ऑनलाइन सभा बोलावण्याची मागणी केली होती.
स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनीही स्थायी समितीची अशी सभा घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आज महापालिकेच्या नगरसचिव विभागाने स्थायी समितीची ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला. स्थायी समितीची ऑनलाईन सभा 21 जुलैला दुपारी एक वाजता होणार आहे. या सभेत 21 विषयांवर चर्चा होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत केवळ आठच सदस्य असल्याने ही सभा ऑनलाइन होणे शक्य होणार आहे. त्यामुळे बंद पडलेल्या विकासकामांना पुन्हा चालना मिळणार आहे.