विद्यार्थ्यांची 1 डिसेंबरपासून ऑनलाइन हजेरी

पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात दि. 1 डिसेंबरपासून होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतील बोगसगिरीला आळा बसणार आहे.
शिक्षकांना दररोज विद्यार्थ्यांची उपस्थिती हजेरीपत्रकावर नोंदवावी लागते. यासाठी वेळही लागतो. त्यातही काही शाळांमध्ये विविध योजनांसाठी अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भानगडी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मात्र “स्विफ्टचॅट’ ऍप्लिकेशनद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन उपस्थितीमुळे बोगसगिरीला चाप बसणार आहे.
ऑनलाइन नोंदणीमुळे कोणत्या शाळेत कोणत्या इयत्तेत किती विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे व किती विद्यार्थी उपस्थित राहतात, याची माहिती शिक्षण विभागाला तत्काळ मिळणार आहे. ऑनलाइन हजेरीबाबत विभाग, तालुका, केंद्रस्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीमुळे केंद्र शासनाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय) मध्ये महाराष्ट्राला आवश्यक गुण मिळण्यास मदतच होणार आहे.
मोबाइल नंबर अपडेट करणे आवश्यक
विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवताना शिक्षकांना आपल्या शाळेचा यू-डायस कोड व स्वत:च्या शालार्थ आयडीचा वापर करावा लागणार आहे. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदवलेला मोबाइल क्रमांक वापरावा लागणार आहे. तो बदलला असल्यास शालार्थ आयडीमध्ये तो अपडेट करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यू-डायस या सर्व पोर्टलवरील माहिती अपडेट करावी लागणार आहे.





