Pune District : कांद्यावर मर, करपाचा प्रादुर्भाव

वाल्हे : मागील काही दिवसांपासून पहाटेपासून दाट धुके पडत आहे. या धुक्यामुळे भाजीपाल्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची तसेच लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. पहाटेच्या वेळी दाट धुके व दवबिंदू पडत आहे. यामुळे लाल कांदा, उन्हाळी कांद्याच्या रोपांवर करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करून, शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
नगदी पिक म्हणून वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, लागवड केलेल्या कांद्याला तसेच काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकांवर मागील काही दिवसांपासून रात्री धुके व पहाटे दवबिंदू, दिवसभर ढगाळ वातावरणामुळे त्यावर करप्याचा प्रादुर्भाव होत आहे. दररोज धुके पडत असल्याने, कांदा उत्पादन शेतकरीवर्ग अडचणीत सापडत आहे. सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी प्रमाणात असून सध्याच्या कांद्याच्या लागवडीचा खर्च देखील वसुल होणे अवघड होत असल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले.
मात्र सध्याच्या वातावरणातील बदलामुळे पुढील काही दिवसांत कांदा उत्पादन अल्प प्रमाणात होणार असल्याने, भविष्यात तरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर, शेतकरी मिळेल तेथून महागडी कांदा रोपे आणून लागवड करताना दिसत आहे. मात्र, सध्या पडत असलेल्या धुके व दवबिंदूमुळे कांदापात पिवळी पडत आहे. लागवड केलेल्या कांद्यावरही या धुक्याचा परिणाम होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी, कैलास पांडूरंग भुजबळ म्हणाले,”
मागील काही दिवसांपासून पहाटे दररोज धुके पडत असल्याने धुक्यामुळे कांद्याची पात करपत आहेत त्यातून संपूर्ण पिकांवर करपा रोग पडण्याची शक्यता असून त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. हे धुके शेतकर्यांचे मोठे नुकसान करणारे आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकर्यांचा आर्थिक खर्च वाढू लागला असून वातावरणातील बदलामुळे बळीराजा कर्जबाजारी होत आहेत.
– कैलास भुजबळ, कांदा उत्पादक
पिकांना रोगराईने ग्रासले
मागील 15 दिवसांपूर्वी रब्बी हंगामातील पिकांना पोषक अशी थंडी पडत होती. मात्र,मागील आठवड्यापासून थंडीचा कडाका कमी होऊन, हवामानात बदल होत असून दोन-तीन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण होत असून पावसाची शक्यता व ढगाळ हवामान यामुळे रब्बीतील मका, कांदा, गहू, ज्वारी, हरभरा, तूर, पालेभाज्या आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ऊसला लागला तुरा
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असला, तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते दोन महिना उशिरा ऊसतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आडसाली ऊस तुटण्यास आधीच उशीर झाला असून उभ्या उसाला तुरा लागला आहे. अशात अवकाळी पाऊस झाला, तर तोडणी आणखी लांबणार आहे. शिवाय, तोडलेला ऊस रस्त्यावर काढण्यासाठी वाहतुकीचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. आधीच दीड वर्ष पीक शेतात अन् त्यात आस्मानी संकट ओढवण्याच्या शक्यतेने ऊस उत्पादकांची चिंता वाढणार आहे.





