Mumbai News : लोखंडी सळई पडल्याने एक जण जखमी

Mumbai News : ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५ च्या मार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पुलावरून लांब लचक लोखंडी सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली. या विचित्र अपघाताच्या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना भिवंडी शहरातील नारपोली ते धामणकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो ५ च्या मार्गावर घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोनू अली, (वय २० रा.विठ्ठलनगर भिवंडी) असे गंभीर जखमी झालेल्या प्रवाश्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जखमी सोनू हा भिवंडी शहरातील विठ्ठलनगर परिसरात कुटूंबासह राहतो. तो भिवंडीत मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास रिक्षातून प्रवास करत होता.
भिवंडी शहरातील नारपोली ते धामणकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या ठाणे-भिवंडी या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असताना, ७ ते ८ फूट लांब आणि २० एमएम जाड असलेली एक सळई थेट वरून पडली आणि खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली.
या अपघाताने प्रवासी रक्तबंबाळ झाला असून, या गंभीर दुखापती नंतरही तो शुद्धीवर होता. स्थानिकांच्या मदतीने जखमी सोनू अली याला भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील नोबेल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.





