राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; वक्फ विधेयक मतदानाला ठाकरेंच्या एका खासदाराची दांडी

नवी दिल्ली : वक्फ सुधारण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आले. २८८ विरूद्ध २३२ मतांनी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. जवळपास १४ तासांपेक्षा अधिक वेळ या विधेयकाबाबत चर्चा झाली. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाने देखील आपली भूमिका जाहीर केली. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज चालले होते. लोकसभेत वफ्क सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज म्हणजे गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे.
यावेळी विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरून विरोध आणि समर्थन करणारी भाषणे झाली. वफ्क सुधारणा विधेयकावरून शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) खासदारांमध्ये लोकसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर विधेयकावर प्रत्यक्ष मतदान झाले. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते.
शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदारांनी या विधेयकासाठी मतदान केले. मात्र, मतदानाच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचा एक खासदार अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे. खासदार नागेश आष्टीकर हे अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे व्यवहार झाल्यानेच घाईत विधेयक मंजूर करून घेतले. विधेयकावरील मतदानात भाजपला ३०० चा आकडा ओलांडता आला नाही. तर, दुसरीकडे विरोधकांची एकजूट भक्कम दिसली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. खासदार नागेश आष्टीकर हे खासदार अनुपस्थित होते. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, आष्टीकर हे सध्या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते मतदानाला अनुपस्थित होते असे संजय राऊत यांनी सांगितले.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी या विधेयकावरील चर्चेवेळी म्हणाले की, सरकार मदराशांना लक्ष्य करत आहे. आता वक्फची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे. मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील. बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील, या विधेयकाचा मुस्लिमांना काहीही फायदा होणार नाही.




