लॉकडाऊनचा एक महिना पूर्ण

नवी दिल्ली -जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शुक्रवारी एक महिन्याचा कालावधी पूर्ण केला. त्या टाळेबंदीमुळे देश ठप्प झाल्याचे चित्र आहे. अर्थात, लॉकडाऊनमुळे करोनाने जबर कहर केलेल्या अमेरिका, युरोपसारखी स्थिती भारतात उद्भवण्याचे टळले, असे वैद्यकीय तज्ञांना वाटत आहे. त्यातून सध्यातरी लॉकडाऊन हेच करोनाविरोधी लढ्यातील भारताचे सर्वांत मोठे शस्त्र ठरले आहे.
संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोनाचा पहिला रुग्ण भारतात 30 जानेवारीला आढळला. त्यानंतर 54 दिवसांनी 25 मार्चपासून 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. त्याद्वारे संपूर्ण देश करोनाविरोधातील निर्णायक लढ्यासाठी सज्ज झाला. लॉकडाऊन सुरू झाल्याच्या दिवशी देशात करोनाबाधितांची संख्या 519 तर करोनाबळींची संख्या 11 इतकी होती. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याची मुदत 14 एप्रिलला समाप्त झाली. त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी आणखी 19 दिवसांनी वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मेपर्यंत असेल.
भारतात लागूू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. त्या कालावधीत देशातील करोनाबाधितांच्या संख्येत सुमारे 23 हजारांनी भर पडली आहे. तर करोनाबळींची संख्या 700 हून अधिक वाढली आहे.
पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनचा पहिला आठवडा 31 मार्चला संपला. त्यादिवशी देशातील करोनाबाधितांची संख्या 1 हजार 397 तर बळींची संख्या 35 होती. दुसरा आठवडा संपल्यावर ती संख्या अनुक्रमे 4 हजार 789 आणि 124 झाली. लॉकडाऊनचा पहिला टप्पा 21 दिवसांनी संपला त्यावेळी करोनाबाधितांची संख्या 10 हजार 815 आणि बळींची संख्या 353 इतकी नोंदली गेली. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि अखेरच्या आठवड्यात रुग्णांची संख्या 6 हजारांनी तर मृतांची संख्या 229 ने वाढली. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दहा दिवसांत म्हणजे 24 एप्रिलपर्यंत करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण 12 हजारांनी वाढले आहेत. तर तेवढ्याच कालावधीत आणखी 365 रुग्ण दगावले आहेत.
आता लॉकडाऊनच्या यशावर तपशीलवार अभ्यासानंतरच प्रकाश पडू शकेल. तूर्त तरी लॉकडाऊनमुळे भारतातील स्थिती बिकट बनली नसल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. लॉकडाऊनअभावी भारताची स्थिती अमेरिका किंवा युरोपसारखी झाली असती, असे त्या तज्ञांना वाटते. जगातील सर्वांधिक करोनाबाधित आणि बळींची नोंद अमेरिकेत झाली आहे. एकट्या युरोप खंडात करोनाने घेतलेल्या बळींचे प्रमाण जगाच्या दोन-तृतीयांश इतके आहे.





