म्हाडातर्फे येत्या वर्षभरात एक लाख घरे; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती

पुणे : म्हाडाच्या सोडतीमध्ये घरे मिळालेल्यांना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते निकालपत्रे देण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी.
पुणे – सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी म्हाडाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या वर्षभरात सुमारे एक लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले. पुणे मंडळाच्यावतीने जिल्हा परिषद येथे आयोजित सदनिका संगणकीय सोडत समारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा सीईओ संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना सावे यांच्या हस्ते निकालपत्रे देण्यात आली.
सावे म्हणाले, पुणे म्हाडाच्या आजच्या सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले. हे प्रमाण म्हणजे नागरिकांनी म्हाडावर दाखवलेला विश्वास आहे. म्हाडाच्यावतीने आतापर्यंत ५ लाख १४ हजार घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
जयस्वाल म्हणाले, म्हाडाच्यावतीने घेण्यात येणारी घरांची ऑनलाइन सोडत पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यात येत आहेत. नागरिकांना सुलभपणे घर मिळत असल्याने विश्वास वाढत आहे. या सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळ तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही उपलब्ध आहे.
अशी आहे पुणे म्हाडाची सोडत
- एकूण घरे – ५,८६३
- आलेले अर्ज – ५९,३५०
- म्हाडा योजनेच्या ४०३ घरांसाठी ७२४ अर्ज
- पंतप्रधान आवास योजना – ४३१ घरांसाठी २७० अर्ज
- २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना – २ हजार ५८४ घरांसाठी ५६ हजार ९४१ अर्ज
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २,४४५ घरांसाठी ४१५ अर्ज




