कराड – ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मुनावळे फाटा येथे सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल भास्कर गोरे (वय 24, रा. मनव, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवार, दि. 18 सकाळी पावणे दहाच्या सुमारास राहुल गोरे हा दुचाकीस्वार पाचवड फाटा च्या दिशेने निघाला होता. त्यावेळी मुनावळे फाट्यावर तो आला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार हा लांब फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघात झाल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन राहुलला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र राहुलचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.