Pune : पक्षाचे निर्णय मान्य करतच पुढे जावे लागते

पुणे : राज्य मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णय असतो. मंत्रिमंडळात घराणेशाहीमुळे नव्हे, तर कर्तृत्वाने आमदारांना संधी मिळाली आहे. संधी न मिळालेल्या आमदारांनी नाराज न होता काही काळापुरते थांबायचे, मग अजून पुढे जायचे असते. नाराजांना पक्षाचे निर्णय हे मान्य करतच पुढे जावे लागते, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात बोलताना दिला.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरुन महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे काही दिग्गजांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त करण्याचा धडाकाच लावलेला आहे. याबाबत बावनकुळे म्हणाले, “भाजपच्या कोणाला मंत्रिमंडळात संधी द्यायचा याबाबतचा निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत अजित पवार, शिवसेनेबाबत एकनाथ शिंदे यांनी आमदारांची मंत्रिमंडळातील संधीबाबत शिफारस केलेली होती.
सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते नाराज नाहीत. त्यांनी आयुष्यभर पक्षाचे प्रामाणिकपणे काम केलेले आहे. त्यांच्याकडे केंद्रीय नेतृत्व मोठी जबाबदारी देण्याचा विचार करत असावे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमध्ये चांगले स्थान मिळेल. त्यामुळे त्यांचीही नाराजी दूर होईल. शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजूत काढतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
आठवलेंची मागितली माफी
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून ही चूक झाली आहे. त्यामुळे त्यांची माफी मागितली आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. आठवले यांचे महायुतीतील स्थान कधीही कमी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.





