पुणे जिल्हा | एक्स्प्रेसच्या इंजिनला अडकून एकाचा मृत्यू

लोणी काळभोर,(वार्ताहर) – पुणे ते लातूर एक्स्प्रेसच्या इंजिनला अडकून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर (ता. हवेली) रेल्वे स्थानकात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
पुणे-लातूर एक्स्प्रेस ही प्रवासी रेल्वे गाडी आठवड्यातून चार फेर्या मारत असते. ही गाडी नेहमीप्रमाणे पुणे स्थानकातून मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लातूरच्या दिशेने निघाली होती. लातूर एक्स्प्रेसने हडपसर रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर मांजरी रेल्वे स्थानकाजवळ एक व्यक्ती रेल्वेच्या समोर अचानक आली.
चालकाने सर्व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गाडी अचानक न थांबवता पुढे नेली. संबंधित व्यक्तीला रेल्वेने जोरदार धडक दिली. इंजिनच्या पुढच्या बाजूला माणूस अडकल्याचे जाणवल्याने चालकाने लोणी काळभोर रेल्वे स्थानकात बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गाडी थांबविली. पोर्टर व रेल्वे कर्मचार्यांच्या मदतीने रेल्वेच्या इंजिनला अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. रेल्वे पोलिसांनी जखमीला त्वरित दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.





