तोंडात जिलेटीनचा स्फोट घडवून एकाची आत्महत्या

संगमनेर -तालुक्यातील पठारभागात जिलेटीनच्या कांडीचा तोंडात स्फोट घडवून एका 46 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. त्यात या व्यक्तीच्या तोंडाच्या चिंधड्या उडाल्या. ही घटना मंगळवारी (दि.29) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुखदेव किसन मधे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अकलापूर शिवारात गाढवलोळी आदिवासीवस्तीवर सुखदेव किसन मधे हे आपली पत्नी, 21 वर्षीय मुलगा अनिकेत व सून यांच्यासह राहात होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुखदेव मधे दारूच्या नशेत घरी परतले. त्यानंतर काही वेळातच सुखदेव मधे व त्यांच्या पत्नीत कडाक्याचे भांडण सुरू झाले.
दारूच्या नशेत असलेले सुखदेव मधे मोठ्याने शिवीगाळ करीत असल्याने त्यांचा मुलगा घराबाहेर आला. त्याने वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. त्यामुळे त्याने आईला स्वतःच्या खोलीत झोपायला बोलावून घेत खोलीचे दार बंद केले. त्यानंतर सुखदेव मधे काही वेळाने दुसऱ्या खोलीत गेले. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या खोलीतून स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने घाबरुन त्यांच्या मुलाने खोलीकडे धाव घेतली असता, समोरचे दृश्य पाहून त्याला चक्कर आली.
सुखदेव मधे यांनी विहिरीच्या कामासाठी घरात आणलेल्या जिलेटीनच्या कांड्यांमधील एक कांडीचा आपल्या तोंडात स्फोट घडवून आला. त्यात त्यांच्या चेहऱ्याच्या अक्षरशः चिंधड्या उड्याल्या. त्यात ते जागीच गतप्राण झाले. या प्रकाराने घाबरलेल्या त्यांच्या मुलाने या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच घारगाव पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, सहायक निरीक्षक जीवन बोरसे, कर्मचारी राजेंद्र लांघे, किशोर लाड व प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रुग्णालयात पाठविला.





