राज्य उत्पादन शुल्क विभाग : विदेशी दारूच्या दोन हजार बॉक्ससह ट्रेलर ताब्यात
नाताळ, “थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
कामशेत – नाताळ आणि थर्टी “फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर परराज्यातील विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याचे खबऱ्यामार्फत माहिती मिळताच कुसगाव पथकर नाक्यावर सापळा रचत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1 कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा मद्य साठा जप्त केला.
या प्रकरणी सदाशिव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 22) खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील गोवा विदेशी मद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची खबऱ्याकडून मिळाली होती. याबाबत जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कुसगाव पथकर वसुली नाकावर चौदा चाकी ट्रेलर (क्र. एम. एच. 46 एच 3534) हा तपासणीसाठी थांबवला. ट्रेलर चालक व क्लीनरने कंटेनर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असल्याची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने कंटेनरची दारूबंदी कायद्यांतर्गत झडती घेण्यात आली.
या वेळी 750 मिलीलीटर क्षमतेच्या एका बॉक्समध्ये 12 बाटल्या असलेले 1200 बॉक्स व 180 मिली क्षमतेच्या एका बॉक्समध्ये 48 बाटल्या 800 बॉक्स असे एकूण 2000 बॉक्स झडतीमध्ये जप्त करण्यात आले. या प्रकरणी ट्रेलर चालक राजेश रत्नाकरन कुरुवाट (वय 28, रा. कोलमपारा, कुरीक्कावल्लापील, मु. कीझमाला पो. करिडालम जि. कासारागोड, केरळ) व क्लीनर विजित श्रीधरन कानीकुलथ (वय 28, रा. 4/198-ए, मदाथिल, मु. कुडोल पो. बिरीकुलम, पाराप्पा रोड, जि. कासारागोड, केरळ) यांना अटक केली. गुन्ह्याशी संबंधित वाहनमालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्यखरेदीदार व गुन्ह्याशी संबंधित असलेले अन्य इसमांना फरार घोषित करण्यात आल असून एकूण 1 कोटी 46 हजार 81 हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल ट्रेलरसह जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा- लवंगारे, संचालक उषा वर्मा यांच्या आदेशानुसार व उपविभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दीपक परब, प्रसाद सास्तुरकर, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, सदशिव जाधव, सुरेश शेगर यांनी कारवाई केली. या वेळी राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे येथील निरीक्षक राजाराम खोत दुय्यम निरीक्षक नरेंद्र होलमुखे व जवान वर्ग यांची मदत घेण्यात आली. या प्रकरणी दीपक परब तपास करीत आहेत.
सात लाखांच्या दारूसह मोटार हस्तगत
महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेले परराज्यातील गोवानिर्मित मद्यासह एक मोटार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आले असून, आरोपी पळून गेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि 21) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पवनानगर-पौड रस्त्यावर काले गावच्या हद्दीतील पवना नदीवरील पुलावर एका मोटारीमध्ये (एम.एच.14 एच.डी. 4985) गोवा निर्मित मद्याच्या आठ बॉक्समध्ये 384 बाटल्या आढळून आल्या. या वेळी गाडी मालक आदिनाथ बबन मालपोटे (वय 30 रा. फळणे ता. मावळ जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो त्याठिकाणाहून पळून गेला आहे. या वेळी एकूण सात लाख चार हजार 240 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल मोटारसह जप्त केला आहे.