संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमाण रथ व सायकल यात्रेचे उत्साहात प्रस्थान

पंढरपूर – शांती, समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,३०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रेचा मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. या सायकल यात्रेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे १०० सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला तर संत तुकाराम महाराज या धर्माचे कळस झाले. संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांनी उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला व भागवत धर्माची पताका फडकावली. पंजाबमधील शीख धर्मीयांमध्ये आपल्या सात्त्विक विचारांचा प्रभाव तेवत ठेवला. मुगल सम्राट फिरोजशा तुघलक यांनी श्री क्षेत्र घुमाण येथे संत नामदेव महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभारले.
श्री विठ्ठल भक्तीचा व शांती, समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण अशी भव्य रथ व सायकल यात्रा २०२२ पासून सुरु करण्यात आली आहे.
५० वारकरी तर १०० सायकल यात्रींचा सहभाग –
संत नामदेव रथ व सायकल यात्रेचे हे तिसरे वर्ष आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील सायकलस्वारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विविध राज्यांतील भाविकांची मागणी आणि संत नामदेव महाराजांच्या शांती, समता व बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी यंदाही भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद, श्री नामदेव दरबार कमिटी (घुमाण) व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संस्था-संघटनांच्या वतीने ही यात्रा १२ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) कडे प्रस्थान ठेवले. या यात्रेत सुमारे ५० वारकरी व १०० सायकलयात्री सहभागी झाले असून, ही यात्रा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा मार्गे पंजाब राज्यात प्रवेश करेल. ४ डिसेंबर रोजी ती श्री क्षेत्र घुमाण येथे पोहचणार आहे.
पंजाबचे राज्यपाल करणार स्वागत –
संत नामदेव महाराजांच्या रथ व सायकल यात्रेचे २ डिसेंबर रोजी चंदिगड येथे राजभवन मध्ये पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे स्वागत करणार आहेत. त्यांच्या हस्ते पादुकांची पूजा व सायकल यात्रींचा सन्मान करण्यात येणार आहे. श्री क्षेत्र घुमाण येथे ५ डिसेंबर रोजी सायकल यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर ही रथयात्रा पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश राज्यातुन प्रवास करीत दि . १२ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.
या प्रस्थान सोहळ्यास नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवसकर, सचिव डॉ अजय फुटाणे, उपाध्यक्ष रविंद्र रहाने, विश्वस्थ वसंतराव खुर्द, पंकज सुत्रावे, सीमा नेवासकर, वैष्णवी नेवासकर, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड. विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, सदस्य राजेंद्र मारणे, राजेंद्रकृष्ण कापसे आदी उपस्थित होते.





