दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांसाठी ‘व्हीलचेअर’, विद्यार्थ्यांना पुस्तक, दप्तरांचे वाटप

पुणे – पुणे शहरामध्ये गेली ४० वर्षांहून अधिक काळ समाजकारण, राजकारणात सक्रिय असणारे, गणेश मंडळाचे आधारस्तंभ दीपक मानकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत दर्शन घेतले, यावेळी त्यांनी बाप्पाच्या चरणी शंखनाद आणि श्रींची आरती करून ६५ किलोचा मोदक अर्पण करण्यात आला.
त्यानंतर पुणे शहरातील दिव्यांग बंधू-भगिनीसाठी व्हीलचेअर, अंध व्यक्तींना काठी, एम.पी.एस.सी.ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, शालेय विद्यार्थ्यांना दप्तरचे मोफत वाटप करण्यात आले. दीपक मानकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केक, गुच्छ व भेटवस्तू न आणता वह्या, पुस्तके, फळे आणावीत, असे आवाहन केले होते.
त्याप्रमाणे आलेले सर्व साहित्य पुणे शहरालगत असलेल्या अनाथआश्रम, वृद्धाश्रम येथे त्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच यावेळी तृतीयपंथी व महिलांकडून ६५ दिव्यांनी ओवाळण्यात आले व वह्या-पुस्तके तुला सुद्धा करण्यात आला होता.
सदर प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वर्धाचे खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, अंकुश काकडे, प्रवीण तरडे, अप्पा रेणुसे, मेघराजे भोसले, प्रवीण चोरबोले, धीरज घाटे, शुक्राचार्य वांजळे, राजेश पांडे, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, मान्यवर नागरिक आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपक मानकर यांना शुभेच्छा दिल्या.









