अक्षय्य तृतीयेनिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीने साकारला श्री पांडुरंगाचा अवतार

आळंदी – अक्षय्य तृतीया या पवित्र सणानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आज भक्तीमय वातावरणात श्री पांडुरंग अवतार चंदन उटीद्वारे साकारण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून चंदन उटीच्या माध्यमातून भगवान विष्णूचे विविध अवतार साकारण्याची परंपरा येथे जोपासली जात आहे. मागील तीन वर्षांपासून श्री पांडुरंग अवताराला प्राधान्य दिले जात असून, यंदाही ही परंपरा कायम ठेवत स्वकाम सेवा संस्थेने ही उटी साकारली.
आळंदीतील माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात आज सकाळपासूनच भक्तांची गर्दी जमली होती. माऊलींना अभिषेक, नैवेद्य, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमही मोठ्या उत्साहात झाले. माऊलींच्या संजीवन समाधीवर त्यांचा मुखवटा ठेवून चंदन उटीद्वारे श्री पांडुरंगाचे मनमोहक रूप साकारण्यात आले. समाधीसमोर माऊलींची प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली होती, माऊली हातात ज्ञानेश्वरीचे पान घेऊन पाहत असल्याची प्रतिमाही दाखवण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात मोगऱ्यांच्या फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली होती.
स्वकाम सेवा संस्थेमार्फत हा चंदन उटीचा सोहळा आणि चैत्र हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या संस्थेचे स्वयंसेवक आणि भक्तांनी एकत्र येऊन मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले. चंदन, मोगऱ्याच्या सुगंधाने आणि पांडुरंगाच्या अवताराने मंदिर परिसरात एक वेगळीच शांती आणि प्रसन्नता पसरली होती. यावेळी उपस्थित भक्तांनी माऊलींच्या दर्शनासह या कलाकृतीचे कौतुक केले.
अक्षय्य तृतीयेनिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीने साकारला श्री पांडुरंगाचा अवतार pic.twitter.com/nlh2ddBZZS
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) April 30, 2025





