पुणे : आखाडातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी 3 ते 4 टन मासळी, 750 ते 800 टन चिकन आणि दीड ते दोन हजार बोकडांचे मटण फस्त केले. नागरिकांनी सकाळपासून दुकांनासमोर रांगा लावल्या होत्या. त्या दुपारी कमी होत गेल्या. तरीही दुकाने बंद होईपर्यंत तुरळक प्रमाणात विक्री सुरूच होती.
लॉकडाउनमुळे मागणीच्या तुलनेत मटणासाठी बोकड, मासळी, चिकनची कमी आवक झाली. हॉटेल बंद असल्याने पुणेकरांना घरीच आखाड साजरा करावा लागला. लॉकडाऊन परिस्थितीतही आषाढातील शेवटचा रविवार असल्याने मटण, मासळी आणि चिनकची दुकाने संध्याकाळपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा दिली होती. मटण, मासळी, चिकनच्या मागणीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली . यामुळे भावातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20 टक्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी गटारी अमावस्या आहे. सोमवारी अनेकजण मांसाहार करत नाहीत. मंगळवार पासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असतो. कित्येकजण दिवाळीपर्यंत मासाहार करण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी आवर्जून मांसाहाराचा बेत आखला होता. दरवर्षी पुणेकर आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार हॉटेल मध्ये जाऊन साजरा करत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हॉटेल, खानावळ बंद होत्या. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी निम्म्याने कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
लॉकडाउनमुळे आपल्या मटण, मासळी मिळेल की नाही चिंता असल्याने नागरिकांनी दुकानासमोर सकाळीपासून रांगा लावल्या होत्या. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनच्या भावात 10 रूपयांनी वाढ झाल्याचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी सांगितले.