Pune District : पहिल्याच दिवशी उच्चांकी 45 रुपये किलो दर

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी(दि.14) पासून कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळी झालेल्या लिलावात राज्यातील उच्चांकी 45 रुपये किलो दर मिळाला. यामुळे स्थानिक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढेही असाच उच्चांकी दर दिल्यास नीरा बाजार समितीत कांद्याची आवक वाढेल असे मत शेतकर्यांनी व्यक्त केले.
हळवी कांदा साठवणूक करता येत नसल्याने तो आता बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्याचबरोबर आगाप लागवड केलेला गरवी कांदा ही काढणीला आला आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर कांदा येणार आहे. याची दखल घेत नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी तातडीने कांदा लिलाव सुरू केले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांदा लिलावाला सुरुवात झाली होती. दर शनिवारी हा कांदा लिलाव सुरू राहणार असल्याचे सभापती शरद जगताप यांनी सांगितले.
ज्येष्ठ संचालक अशोक निगडे व बाळासाहेब जगदाळे यांच्या हस्ते शनिवार दुपारी चार वाजता वजनकाट्याची पूजा व श्रीफळ वाढवून उद्घान करण्यात आले. यावेळी सभापती शरद जगताप, संचालक देविदास कामठे, भाऊसाहेब गुलदगड, राजकुमार शहा, गणेश होले, बाळासाहेब शिंदे, सुशांत कांबळे, अनिल माने, विक्रम दगडे, पृथ्वीराज निगडे, व्यापारी मनसुखलाल शहा, बिपीन शहा, दिलीप परदेशी, निलेश स्वामी, शुभम शहा यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या शेतकर्यांचे, व्यापार्यंचे, हमाल, तोलारी यांचे स्वागत गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन करण्यात आले.
पुरंदर व बारामती तालुक्यातील शेतकर्यांच्या शेत मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी हे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. पुढील महिन्यापासून पहाटेच्या वेळी भाजिपाल्याचा बाजार सुरू करत आहोत. तसेच भुसार बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आता नव्याने धान्य खरेदी विक्री केली जाणार आहे. यासाठी व्यापार्यांशी बोलणी झाली आहे. मार्च महिन्यात धान्य बाजार सुरू करुन, नीरा बाजार समितीचे गत वैभव पुन्हा प्राप्त करू.
– शरद जगताप, सभापती, बाजार समिती, नीरा





