नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या. यात अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात चर्चा सुरू झाली. अशात खाते वाटपावरूनही शिंदे गटातील नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे आता लवकरच राजीनामा देतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत. या सर्व चर्चांवर आता शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका मांडली आहे. शंभूराज देसाई म्हणाले,मुख्यमंत्री नाराज नाही, त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही सगळे एकत्र लढवणार आहे. २०० पेक्षा जास्त आमदारांचं बहुमत आमच्याकडे आहे. सगळ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आहे. ज्यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार राहिले आहेत ते लोक आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची खोटी अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका’ असं म्हणत सर्व काही ठीक असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.