शिरूर: शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला भेट दिली ‘सोन्याची अंगठी’

शिरूर – कवठे येमाई (ता. शिरूर) येथिल जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आशा गणेश पवार (शिंदे) यांना शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी चक्क सोन्याची अंगठी व मानचिन्ह देवून सन्मानित केले. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (२०२३/२४) मध्ये या शिक्षिकेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील राज्य गुणवत्ता यादीत २ व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ७ असे एकूण ९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते.
सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्गशिक्षिका आशा गणेश पवार यांनी बहुमोल मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांकडून आपल्या आदर्श शिक्षकेला भेटवस्तू म्हणून एक सुवर्ण अंगठी व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांच्या वतीने देखील सन्मानचिन्ह, संपूर्ण पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यामुळे कवठे येमाई परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले असून यापुढील काळात शाळेची अशीच प्रगती होत राहो, अशी अपेक्षा पालकांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष डॉ. आरती उचाळे, कंत्राटदार भाऊसाहेब घोडे, नितीन मुखेकर, शिक्षक नवनाथ शिंदे, विलास सालकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम पोकळे यांनी केले व आभार शैला इचके यांनी मानले.
यश संपादन केलेल्या विद्यर्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
1) स्वरा विलास सालकर, २७६ (राज्य गुणवत्ता यादी)
2) देवदत्त अजित सरोदे, २७४( राज्य गुणवत्ता यादी)
3) आदिती गणेश पवार- २६०
4) समृद्धी संतोष उचाळे -२५२
5) संस्कृती भाऊ घोडे- २४८
6) राधिका मच्छिंद्र पुंडे -२४६
7) राजेश्वरी नवनाथ शिंदे -२३८
8) वैष्णवी नवनाथ वागदरे२३८
9)मानवी नितीन मुखेकर २३६





