सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुख स्पष्टच म्हणाले,’देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल’

Sachin Vaze on Anil Deshmukh | राज्यात सुरु असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यातच आता अनिल देशमुख खंडणी वसुली प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. कारण निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केला होता. एवढच नाही तर वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी दिली आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
सचिन वाझे यांनी सध्या सुरु असणाऱ्या देशमुख विरुद्ध फडणवीस प्रकरणात मोठे विधान केले आहे. याविषयी बोलताना वाझे म्हणाले, “सगळे पुरावे आहे. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत.
पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहले आहे.”असे त्यांनी म्हटले. या आरोपानंतर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
Sachin Vaze on Anil Deshmukh | नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख
मी गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते. जी वस्तुस्थिती मी समोर आणली होती. कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करुन द्यावं, यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता. ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेंनी माझ्यावर जे आरोप केले, ती देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
Sachin Vaze on Anil Deshmukh | काय आहे प्रकरण?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात मागील वर्षी एप्रिल महिन्यात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.





