पुणे जिल्हा | किल्ले पुरंदरवर ढोल-ताशा, तुतारीचा निनाद

गराडे, (वार्ताहर) – किल्ले पुरंदर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सोहळ्यानिमित्त भगवे झेंडे, लाल, गुलाबी, भगवे फेटे, ढोल ताशांचा गजर आणि सनई आणि तुतारीच्या निनाद, पुरंदर किल्ल्यावर फुलांची केलेली सजावट, पाळणा गीत, उपस्थितांना महाप्रसाद, आणि मान्यवरांचे सत्कार यामुळे कार्यक्रमात रंगत आली होती.
महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शंभू भक्तांनी किल्ल्यावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रात्री 12 वाजेपासून शंभू भक्त ज्योत घेवून येत होते. छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणांनी किल्ल्याचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. पुरंदर किल्ल्यावरील श्री महादेव मंदिरात सकाळी 8. वा. शासकीय महापूजा करण्यात आली.
त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार,
गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, राज्य बांधकाम विभागाच्या अभियंता स्वाती दहिवाल यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे नेते, प्रतिनिधी, शिक्षक आणि हजारो शंभू भक्त उपस्थित होते.
पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती. उपस्थितांना शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, रणजीत बाठे, योगेश देशमुख, रविराज शिंदे उपस्थित होते.
शासकीय सोहळा नावापुरताच?
शासनाने किल्ले पुरंदर येथे मागील वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज यांची शासकीय जयंती साजरी करण्याचे आदेश काढले. मात्र शासकीय सुविधा कोणत्याही उपलब्ध केल्या नाहीत. याबद्दल राज्यातील शंभू भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय महापूजा करताना शासनाने सकाळी 10 वाजता कार्यक्रम घेणे अपेक्षित असताना राज्यातील हजारो शंभू भक्त तसेच विविध संघटना सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करीत असताना अधिकारी मात्र सकाळी 7 वाजताच पूजा करून निघून जातात.
याव्यतिरिक्त उपस्थित हजारो नागरिकांसाठी पाण्याची सोय, जेवण, मान्यवरांचे सत्कार, मंडप तसेच संभाजी राजांना पोलिसांच्या वतीने सलामी देणे अपेक्षित आहे. किल्ले शिवनेरी, प्रतापगड येथे सर्व सुविधा आणि निधी देत असताना पुरंदर किल्ल्याच्या बाबतीत शासन दुजाभाव का करीत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





