पुणे जिल्हा | गराडे धरण 100 टक्के भरले

गराडे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील महत्वाचे शहर असलेल्या सासवडसह पाच गावांना पाणीपुरवठा करणारे गराडे धरण बुधवारी (दि. 24) 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी कर्हा नदी पात्रात वाहण्यास सुरुवात झाली आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच गराडे व आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने गराडे धरण पूर्णपणे भरले आहे. आता त्याच्या सांडव्यातून पाणी कोसळण्यास सुरुवात झाली असून त्याचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व कात्रज डेअरीचे माजी संचालक गंगाराम जगदाळे, गराडेचे सरपंच नवनाथ गायकवाड, चांबळीच्या सरपंच प्रतिभा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
सासवड शहरासह पुरंदरच्या ग्रामीण भागातील गराडे, चांबळी, हिवरे, भिवरी, बोपगाव अशा गावांना पाणीपुरवठा करणारे धरण असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर कर्हा नदी वाहू लागल्यास तालीक्यातील शेतकर्यांश गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
यावेळी भाजपचे युवा नेते जालिंदर जगताप, चांबळीचे उपसरपंच संजय कामठे, प्रगतशील शेतकरी शिवाजी जगदाळे, गोकुळ जगदाळे, माजी उपसरपंच नितीन जगदाळे, भाऊसाहेब रावडे, माजी उपसरपंच दत्तात्रय जगदाळे, अविनाश जगदाळे, शहाजी कामठे, गराडे ग्रामपंचायत सदस्य समीर तरवडे, मयूर जगदाळे, मारुती कामठे, प्रकाश शेंडकर, म्हस्कु कामठे आदींसह चांबाळी व गराडेचे नागरिक उपस्थित होते.
..तर 72 वाड्यावस्त्यांचा पाणीप्रश्न मिटेल
पावसाने असाच जोर कायम ठेवला तर कर्हा नदीमधून पाणी नाझरे धरणात पोहोचणार असल्याने कोरठेठाक पडलेले नाझरे धरण भरण्यास सुरुवात होणार झाल्यावर पुरंदरसह बारामतीतील 72 वाड्यावस्ती आणि गावे यांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो, त्यामुळे पावसाची कृपा कायम हवी.





