‘माझी लाडकी बहिण योजने’वर अमृता फडणवीस म्हणाल्या,’…अशीच सरकारची इच्छा’

मुंबई – राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेवर सर्वच स्तरातून कौतूक जात असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
श्रावण सरी आणि मंगळागौर या कार्यक्रमात अमृता फडणवीस बोलतांना म्हणाल्या,’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट आहे. हे पैसे महिलांच्या बचत खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या पैशांमुळे त्यांची छोटी मोठी गरज असेल त्याला हातभार लागावा, अशीच सरकारची इच्छा आहे. तसेच स्टंटमॅन लोकांनी कोण काय करतंय हे सांगायची गरज नाही. ही योजना सर्वसामान्य महिलांसाठी आहे. त्यामुळे स्टंटमॅन लोकांनी हे स्टंट सुरू आहेत, असे सांगण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना देखील ही योजना का राबवली जात आहे, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे.





