satara | शुक्रवार पेठेतील विहिरीला झाडाझुडपांचा विळखा

सातारा, (प्रतिनिधी) – विहीर स्वच्छतेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाचे दुर्लक्षशुक्रवार पेठेतील बदामी विहीर शेजारील लोखंडी बंदिस्त विहिरीला झाडाझुडपांचा विळखा पडला असून या विहिरीत वङ पिंपळ व इतर वृक्षांनी बहरले आहेत.
वृक्षांची पाने विहिरीत पडून मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे साचलेला कचरा पाण्यात पडून तो कुजल्याने त्याची दुर्गंधी येत आहे. परिणामी सदर विहिरीतील पाणी हे दूषित झाले आहे. विहीर स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
विहिरीतील असलेल्या कचरा व विहीर स्वच्छता होणे गरजेचे आहे. नजीकच्या काळात पावसाचे पडणारे पाणी पाहता या विहिरीतील साचलेल्या कचऱ्यामुळे रोगराईचा फैलाव होऊ शकतो.
मुळात या विहिरीचा उपसा न झाल्याने येथील पाण्यात जीव जंतूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे. बंदिस्त विहिरीतील वाढलेले झाडे झुडपे काढून ही विहीर स्वच्छ करावी, अशी मागणी पेठेतील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
काही वर्षांपूर्वी येथील स्थानिक नागरिकांसाठी ही विहीर जलसंजीवनी ठरत होती. या विहिरीचा वापर नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी व घरगुती वापरण्याच्या कामासाठी करत होते. परंतु काळाच्या ओघात प्रत्येकाच्या घरात नळाचे कनेक्शन पोहोचल्याने या विहिरीचा वापर बंद झाला परिणामी ही विहीर दूषित व दुर्गंधी युक्त झाली.
अनंत इंग्लिश स्कूल ते गेंडामाळ नाका या मार्गावर शुक्रवार पेठ येथे रस्त्याकडेला असलेल्या या विहिरीची डागडूजी करून या विहिरीला लोखंडी ग्रील सह झाकण टाकून विहीर सुरक्षित केली. स्थानिक नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या पुढाकाराने लाखो रुपये या विहिरीवर खर्च करण्यात आले. परंतु प्रशासनाचे झालेल्या दुर्लक्षामुळे या विहिरीला आता झाडाझुडपाचा विळखा पडला आहे.





