Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; बैठकीमध्ये नेमकं काय घडलं?
धाराशिवचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'शिवसेनेत' प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Omraje Nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्या एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. धाराशिवचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेनेत’ प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
स्वतः ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर या चर्चांना उधाण आले असून, ते लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
कार्यकर्त्यांच्या बैठकीत ओमराजेंकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज आपल्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत बोलताना ओमराजेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकांची कामे करण्यासाठी सत्तेची साथ असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडले. तसेच, “मी जो काही निर्णय घेणार आहे, तो तुम्हा सर्वांना मान्य असावा,” असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.
“लोकांच्या कामांसाठी निधी हवा, सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व स्वीकारावे लागेल”
या अंतर्गत बैठकीत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भूमिकेमागचे कारण स्पष्ट केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले “आपल्याला मतदारसंघातील लोकांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. ही कामे मार्गी लावायची असतील, तर आपल्याला सत्तेत असलेल्या नेतृत्वाचा स्वीकार करावा लागेल. सध्या अगदी साध्या साध्या कार्यकर्त्यांच्या कामांमध्येही अडचणी येत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.”
तसेच, विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “आपला निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. काही लोक म्हणतात की मी निकाल लावण्यासाठी गेलो होतो. पण जर तसं असतं, तर मी २२ तारखेलाच गेलो असतो ना? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भागातील प्रश्नांची आणि कार्यकर्त्यांची दखल घेतली आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या हितासाठी मी लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून, या निर्णयाच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे.”
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीत धाराशिवमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे आक्रमक आणि महत्त्वाचे नेते मानले जातात. मात्र, त्यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदेंची स्तुती केल्यामुळे आणि सत्तेसोबत जाण्याचे संकेत दिल्यामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मराठवाड्यात हा एक खूप मोठा धक्का मानला जात आहे. ओमराजे निंबाळकर अधिकृतपणे कधी प्रवेश करतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






