Omraje Nimbalkar : महायुती सरकारमध्ये येताच ओमराजे निंबाळकर अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंकडे केल्या आठ प्रमुख मागण्या
Omraje Nimbalkar : शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरेंच्या पक्षाची साथ सोडत सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभाग घेतला. यात धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांनीही मोठी बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानतंर ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. विशेष म्हणजे 6 खासदारानंतर सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली.
मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील आठ प्रमुख मागण्या ठेवल्याची माहिती ओमराजेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
ओमराजे निंबाळकरांची फेसबुक पोस्ट
मुंबई येथील नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या मागण्यांचे निवेदन सादर केले, असे ओमराजेंनी सोशल मीडियावर लिहिले आहे.
यावेळी शेतकरी, पाणी, सिंचन, वीज, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
एकनाथ शिंदेंकडे ओमराजेंनी केलेल्या आठ प्रमुख मागण्या
१. टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून CSR निधी तसेच राज्य सरकारच्या सहकार्याने धाराशिव लोकसभा मतदारसंघात आधुनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात यावे, जेणेकरून स्थानिक युवक-युवतींना उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे ओमराजे म्हणाले.
२. कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी.
३. सात टीएमसी पाण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करून प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत.
४. पीक विम्यातून वगळलेले ट्रिगर पुन्हा लागू करून शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळावा, यासाठी विमा कंपनीच्या निकषांमध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत, अशी महत्त्वाची मागणी ओमराजे यांनी केली.
५. महावितरण कार्यालयाचे विभाजन करून वैराग येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात यावे.
६. शेतजमीन खरवडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत वितरित करण्यात यावी.
७. मांजरा आणि तेरणा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून जलसाठा वाढवण्याची योजना राबवण्यात यावी.
८. कौडगाव एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्कची स्थापना करुन परिसरातील औद्योगिक विकासाला चालना देण्यात यावी, अशी मागणी.
याशिवाय, श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी आणि मंदिर प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधून राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ, सुरळीत व जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे ओमराजेंनी सांगितले.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लागावेत, शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आल्याचेही ओमराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील पक्षप्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. तसेच आता महायुती सरकारमध्ये येताच ओमराजे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:
Curd Recipes: दह्यापासून बनवा ५ झटपट हेल्दी रेसिपी; चवही जबरदस्त, पोषणही भरपूर!




