Curd Recipes: दह्यापासून बनवा ५ झटपट हेल्दी रेसिपी; चवही जबरदस्त, पोषणही भरपूर!
Curd Recipes दह्याचा वापर करून काही झटपट आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. हे पदार्थ चविष्ट तर असतातच, शिवाय नाश्ता, दुपारचे जेवण किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठीही उत्तम पर्याय ठरू शकतात.

Curd Recipes: दही हा भारतीय आहारातील अत्यंत महत्त्वाचा आणि पौष्टिक पदार्थ मानला जातो. अनेक घरांमध्ये दह्याचा रोजच्या जेवणात समावेश असतो. विशेषतः उन्हाळ्यात दही खाण्याचे प्रमाण अधिक वाढते, कारण ते शरीराला थंडावा देण्यास मदत करते. दही केवळ चविष्टच नाही, तर ते सहज पचणारे असून आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी-१२, रिबोफ्लेविन, पोटॅशियम आणि प्रोबायोटिक्स यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास, हाडे मजबूत होण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.
दह्याचा वापर करून काही झटपट आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. हे पदार्थ चविष्ट तर असतातच, शिवाय नाश्ता, दुपारचे जेवण किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठीही उत्तम पर्याय ठरू शकतात.
१. दही-भात
शिजवलेला भात थंड झाल्यानंतर त्यामध्ये ताजे दही मिसळा. त्यावर मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची यांची फोडणी द्या. आवडीनुसार डाळिंबाचे दाणे किंवा किसलेले गाजर घालू शकता. हा पदार्थ हलका, सहज पचणारा आणि प्रोबायोटिक्स तसेच कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत मानला जातो.
२. दही सँडविच
घट्ट दह्यामध्ये बारीक चिरलेला काकडी, गाजर, ढोबळी मिरची, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ मिसळा. हे मिश्रण ब्राऊन ब्रेडवर लावून सँडविच तयार करा. हा झटपट बनणारा पौष्टिक नाश्ता असून त्यातून प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे मिळतात.
३. व्हेजिटेबल रायता
दह्यामध्ये काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड मिसळा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. हा रायता शरीराला हायड्रेट ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि आवश्यक पोषक घटक मिळवून देण्यास मदत करतो.
४. दही-ओट्स
ओट्स हलके उकळून किंवा भिजवून थंड करा. त्यामध्ये दही मिसळा. त्यावर सफरचंद, केळी, बेरीज, चिया सीड्स किंवा सुका मेवा घालून खा. हा फायबर, प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सने भरलेला पौष्टिक नाश्ता आहे. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि दिवसभर ऊर्जा मिळते.
५. दही स्मूदी
दह्यामध्ये केळे, आंबा, स्ट्रॉबेरी किंवा आवडीचे कोणतेही फळ घालून ब्लेंड करा. चव वाढवण्यासाठी थोडे मध आणि चिया सीड्सही घालू शकता. ही स्मूदी शरीराला प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि ऊर्जा देणारे स्वादिष्ट पेय आहे.
दह्याची पौष्टिकता कशी वाढवाल?
दह्यामध्ये हंगामी फळे, काकडी, गाजर, टोमॅटो किंवा बीटरूट मिसळल्यास त्याची पौष्टिकता अधिक वाढते. तसेच चिया सीड्स, जवस, तीळ किंवा विविध प्रकारचा सुका मेवा घातल्यास हेल्दी फॅट्स आणि फायबरचे प्रमाण वाढते. ओट्स, म्यूसली किंवा मोड आलेली कडधान्ये दह्यासोबत खाल्ल्यास संतुलित आणि पोषणमूल्यांनी भरलेला आहार तयार होतो. चव वाढवण्यासाठी पुदिना, कोथिंबीर किंवा भाजलेल्या जिऱ्याची पूडही वापरू शकता. मात्र दह्यामध्ये जास्त साखर किंवा गोड सिरप मिसळणे टाळावे.
दही खाताना या गोष्टी लक्षात ठेवा
नेहमी ताजे आणि चांगल्या दर्जाचे दहीच खावे. पॅकेटबंद दही वापरत असाल तर त्याची एक्सपायरी डेट तपासणे आवश्यक आहे. दह्याचे अतिसेवन टाळून ते संतुलित आहाराचा भाग म्हणून खावे. तसेच ज्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी आहे किंवा लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या आहे, त्यांनी दही खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दह्याचा आहारात समावेश केल्यास चव आणि आरोग्य या दोन्हींचा उत्तम समतोल साधता येतो.





