दिल्लीत पुन्हा मिळाले ‘ओमायक्रॉन’चे चार रुग्ण; एकूण बाधितांची संख्या दहा

नवी दिल्ली – देशात ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन प्रकाराची लागण होण्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. करोना विषाणूचे धोकादायक रूप आता 11 राज्यांमध्ये पसरले आहे. बुधवारी ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण केरळमध्ये चार, महाराष्ट्रात चार, तेलंगणात दोन आणि पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण 12 रुग्णांची एका दिवसात पुष्टी झाली आहे. त्याचवेळी दिल्लीत आज आणखी चार रुग्ण आढळले आहेत. यासह, देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 77 वर पोहोचली आहे.
दिल्लीत ओमिक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या 10 झाली आहे. या 10 रुग्णांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून नऊ जण अजूनही एलएनजेपी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, देशातील एकूण ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या 77 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक आतापर्यंत एकूण 32 प्रकरणे आढळून आली आहेत. राजस्थान 17 प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय गुजरात (4), कर्नाटक (3), केरळ (5), आंध्र प्रदेश (1), तेलंगणा (2), पश्चिम बंगाल (1), चंदीगड (1), तामिळनाडू (1) यांचा समावेश आहे.





