Corona Increase In India : हॉटेल, ट्रॅव्हल इंडस्ट्रीला सतावतेय लॉकडाऊनची भीती, सरकारकडे मदतीची याचना

लखनौ – करोनाच्या नव्या लाटेने हॉटेल आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीला पुन्हा लाॅकडाऊनची भीती सतावत आहे. गेल्या काही महिन्यांत हॉटेल व्यवसायाशी निगडित 35 लाखांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो ट्रॅव्हल एजंट रस्त्यावर आले होते. ट्रॅव्हल एजंट्सच्या म्हणण्यानुसार, पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जानेवारीमध्ये 30 ते 50 टक्के बुकिंग रद्द करण्यात आली आहे. पुन्हा रोजगाराचे संकट उभे राहिले आहे. त्याचबरोबर रेस्टॉरंट चालकांनी गृह सचिवांना पत्र लिहून लॉकडाऊन लागू न करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनच्या या लाटेचा 60 हजार हॉटेल्स आणि 5 लाख रेस्टॉरंट्सला मोठा फटका बसू शकतो.
दरम्यान, 6 महिन्यांपूर्वी 30 जून रोजी वरुण खेरा यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून नोएडामध्ये पुन्हा आपले रेस्टॉरंट सुरू केले. यावेळी नवीन वर्षात चांगला व्यवसाय अपेक्षित होता, मात्र आता पुन्हा एकदा लॉकडाऊनचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रेस्टॉरंट असोसिएशनने गृह सचिवांना पत्र लिहून लॉकडाऊन लागू न करण्याची मागणी केली आहे. नोएडा रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष वरुण खेरा यांनी सांगितले की, आम्ही सरकारला पत्र लिहिले आहे, समोर येत असलेल्या बातम्यांचा आमच्या उद्योगावर सर्वात वाईट परिणाम होत आहे, वेळ कमी करावी पण पूर्ण लाॅकडाऊन नको, असे पत्रात लिहिले आहे.
केवळ रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसायच नाही तर छोटे – मोठे ट्रॅव्हल एजंट देखील अडचणीत आहेत, 1 जानेवारीला चांगला व्यवसाय अपेक्षित होता. मात्र ओमायक्रॉनच्या भीतीमुळे टूर रद्द होत आहेत. 70 टक्के आंतरराष्ट्रीय दौरे बंद झाले आहेत. देशी पर्यटकांनीही 30 ते 40 टक्के बुकिंग रद्द केले आहेत. ट्रिप अड्डा चे सीईओ मृत्युंजय सिंग म्हणाले की, आमचा मुख्य व्यवसाय कौटुंबिक प्रवासींवर अवलंबून आहे. हंगामही दोन ते चार महिन्यांचा असतो. अशा स्थितीत जानेवारीचा संपूर्ण हंगाम गेला असून सर्व बुकिंग रद्द करण्यात येत आहेत. आमच्या क्षेत्रावर पुन्हा एकदा उपासमारीचे संकट येत असल्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.





