Pune District | खासगी ट्रॅव्हल्सची तिकीट दरवाढ

पुणे,- दिवाळीला गावी जाताना आणि सुट्ट्या संपून पुण्यात येताना खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून वाढीव तिकीट दरांतून प्रवाशांची लुटमार झाली. अनेक मार्गावर प्रवाशांना दुप्पट तिकीट आकारण्यात आले. मात्र, जास्त तिकीट घेणारी एकही ट्रॅव्हल्स आरटीओला सापडली नाही. त्यामुळे आरटीओची पथके नेमकी काय तपासणी करीत होती, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
रेल्वे आणि एसटीचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सचाच पर्याय उरला. त्याचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरांमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली, अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जाईल, असे निर्देश पुणे आरटीओने ट्रॅव्हल्स चालकांची बैठक घेऊन दिले होते. त्यासाठी पथकही नेमले. मात्र, या पथकांना एकही ट्रॅव्हल्स जादा तिकिट दर आकारल्याचे दिसून आले नाही.
पुण्यातून दिवाळीच्या काळात दिवसाला एक हजारांपेक्षा जास्त ट्रॅव्हल्स राज्याच्या वेगवेगळ्या भागात जात होत्या. यातील बऱ्याच ट्रॅव्हल्स चालकांडून तिकीट दर दुप्पट केले होते. नागपूरला जाण्यासाठी चार हजारांपर्यंत तिकीट गेले होते. तर, इतर शहरांची तिकीटे देखील मोठ्या प्रमाणात वाढवली होती. दिवाळीच्या अगोदर व दिवाळीनंतर पुणे आरटीओकडून फक्त १०६ बसची तपासणी झाली. दिवसाला एक हजार बस धावत असताना पंधरा दिवसांमध्ये आरटीओकडून तपासणी म्हणावी अशी झालीच नाही. त्यामुळे जादा तिकीट आकारल्याचे दिसून आले नाही. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागल्याचे दिसून आले.





