ओमर अब्दुल्लांची स्थानबद्धतेतून सुटका
Updated On:

श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची आज सुमारे आठ महिन्यांच्या स्थानबद्धतेनंतर सुटका करण्यात आली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरील ही कारवाई मागे घेण्यात आल्यानंतर त्यांची ही सुटका करण्यात आली.
गेल्या 5 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून त्याचे विभाजन केले व दोन केंद्रशासित प्रदेश जाहीर केले होते. त्यानंतर तेथील अनेक राजकीय नेत्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यावेळी ओमर अब्दुल्लांनाही ताब्यात घेण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना केवळ दक्षतेचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आले होते पण नंतर मात्र त्यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.





