Irani Cup 2026 : ऐतिहासिक रणजी चॅम्पियन १११ धावांवर गारद! रेस्ट ऑफ इंडियाने १६७ धावांनी जिंकला इराणी कप; मुकेश कुमारचा भेदक मारा
Irani Cup 2026 : श्रीनगरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, रेस्ट ऑफ इंडियाने जम्मू आणि काश्मीर संघासमोर विजयासाठी २७९ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, जम्मू आणि काश्मीरचा संघ त्या लक्ष्याच्या निम्म्यापर्यंतही पोहोचू शकला नाही.

Irani Cup 2026 Rest Of India Beat Ranji Champions JK Mukesh Kumar 6 Wickets : रणजी करंडक जिंकून देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचणाऱ्या जम्मू-काश्मीरचे (J&K) ‘डोमेस्टिक डबल’ पूर्ण करण्याचे स्वप्न भंगले आहे. श्रीनगरमध्ये खेळल्या गेलेल्या इराणी करंडक २०२६ (Irani Cup 2026) च्या सामन्यात रेस्ट ऑफ इंडियाने (Rest of India) चौथ्याच दिवशी जम्मू-काश्मीरचा १६७ धावांनी दणदणीत पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने (Mukesh Kumar) अखेरच्या डावात अवघ्या काही षटकांत ६ गडी बाद करत रेस्ट ऑफ इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
रेस्ट ऑफ इंडियाचा ३२० धावांत खेळ खल्लास; जेकेला २७९ धावांचे आव्हान!
रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी सामन्याच्या चौथ्या दिवशी रेस्ट ऑफ इंडियाचा दुसरा डाव पहिल्याच सत्रात ३२० धावांवर संपुष्टात आला. तिसऱ्या दिवसाच्या धावसंख्येत संघ केवळ १४ धावांची भर घालू शकला. शतकवीर स्मरण रविचंद्रन १३५ धावांची संयमी खेळी करून अखेरचा फलंदाज म्हणून बाद झाला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर रेस्ट ऑफ इंडियाने जम्मू-काश्मीरसमोर विजयासाठी २७९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते.
५४ धावांची सलामी भागीदारी; त्यानंतर मुकेश-आकाशचे मैदानावर वादळ!
5⃣-wicket haul ✅
Victory sealed next ball ✅🎥 Scenes of celebration in the Rest of India camp as Mukesh Kumar ends an incredible spell in style 🔥
Updates ▶️ https://t.co/yLmHBGjsCe
#IraniCup | @mflone_ https://t.co/ia9apVIfOY
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 4, 2026
लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू-काश्मीरच्या सलामीवीरांनी ५४ धावांची आश्वासक सुरुवात केली होती. मात्र, पहिली विकेट पडताच डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. भारतीय कसोटी संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनी अशी काही आग ओकली की, अवघ्या २८.४ षटकांत १११ धावांवर संपूर्ण संघ गारद झाला. जम्मू-काश्मीरकडून शुभम खजुरियाने सर्वाधिक ३६ धावा केल्या. मुकेश कुमारने भेदक मारा करत ६ विकेट्स, तर आकाश दीपने ३ गडी बाद केले.
कर्णधार ऋषभ पंतला ताप; सर्फराझ खानने सांभाळली कमान!
𝗪.𝗜.𝗡.𝗡.𝗘.𝗥.𝗦 🏆
Congratulations to Rest of India on winning the prestigious #IraniCup 2026 with a 167-run victory in Srinagar 👏
@mflone_ https://t.co/iUudKo9OpJ
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 4, 2026
कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) तीव्र तापाने फणफणल्यामुळे चौथ्या दिवशी मैदानात उतरू शकला नाही. या आजारपणामुळेच तो दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. अखेरच्या दिवशी पंतच्या अनुपस्थितीत सर्फराझ खानने रेस्ट ऑफ इंडियाचे उत्कृष्ट नेतृत्व करत संघाला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले.





