जम्मू : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी कॉंग्रेसचे समर्थन करताना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. अपयश आल्यावर भाजपकडून इतरांना दोष दिला जातो, अशी टिप्पणी त्यांनी केली. लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेहमध्ये बुधवारी हिंसाचार झाला. त्याचे खापर भाजपने कॉंग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल उमर यांनी भाजपला लक्ष्य केले. लडाखमध्ये एकप्रकारे भाजपची राजवट आहे. तेथील मागील कौन्सिल निवडणुकांत भाजपने विजय मिळवला. तर, कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. हिंसाचार घडवण्याइतक्या मजबूत स्थितीत कॉंग्रेस लडाखमध्ये आहे का? जेव्हा भाजपच्या दृष्टीने काही प्रतिकूल घडते; तेव्हा तो पक्ष कारणे घेऊन पुढे येतो. लेहमधील हिंसाचार म्हणजे नायब राज्यपालांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाचे अपयश आहे. इतरांना दोष देण्याचा काही उपयोग नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. लडाखमधील जनतेने कायदा हातात न घेता शांतता अबाधित ठेवावी. त्यांच्या वैध मागण्यांकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मेहबुबा मुफ्तींचे केंद्रावर टीकास्त्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लडाखमध्ये हिंसाचार झाला, असे टीकास्त्र जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोडले. लडाखच्या जनतेला केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक आश्वासने दिली. मात्र, मागील ६ वर्षांत काहीच घडले नाही. त्यामुळे त्या जनतेची सहनशक्ती संपली. लडाखमधील जनेतला आपली ओळख, संस्कृती, जमीन, रोजदार आदी बाबींचे रक्षण हवे आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक आल्यास अवघी काही लाख संख्या असणाऱ्या लडाखी जनतेचे स्वत:चे काय उरेल, असा प्रतिसवाल त्यांनी पत्रकारांशी श्रीनगरमध्ये बोलताना केला. कॉंग्रेसने हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा भाजपचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. लडाखमधील हिंसाचार म्हणजे जनतेचा उद्रेक होता, असे त्या म्हणाल्या.