Om Birla – लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव दोन दिवस झालेल्या वादळी चर्चेनंतर बुधवारी आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. यामुळे ओम बिर्ला सभापतीपदी कायम राहणार आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांनी ओम बिर्ला यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत अविश्वास प्रस्ताव मांडला होता. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा सभापती यांचे जोरदार समर्थन केले. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. अमित शहा म्हणाले, तुमचे हक्क सुरक्षित असू शकतात, पण विशेषाधिकारांच्या भ्रमात जगणे चुकीचे आहे. काँग्रेसने सभापतींच्या पदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर तुम्ही सभापतींना प्रश्न विचारला तर तुम्ही कोणाच्या संरक्षणाखाली बोलता? तर काम कसे होईल? लोकशाहीत मोठे बदल झाले आहेत. आम्ही आमच्या राजकीय प्रवासाचा बहुतेक काळ विरोधी पक्षात घालवला आहे, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर टीका करत काँग्रेसवर निशाणा साधला. आम्ही कधीही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. विरोधकांना बोलण्यापासून रोखले नाही. सत्ताधाऱ्यांना तो अधिकार नाही. लोकसभा सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणे, सामान्य घटना नाही. ही खेदाची बाब असून सभापती कोणत्याही एका पक्षाचा नसतो. तुम्हाला हवे होते तर पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून बघायचा होता. पण, सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव योग्य नाही, असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला. सभागृह चालवण्यासाठी ठराविक नियम असून त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. एखादा सदस्य नियमांकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला रोखणे, इशारा देणे किंवा बाहेर काढणे हा सभापतींचा अधिकार आहे. सभागृह जत्रा नसून, येथे नियमांनुसार बोलावे लागते. नियमांचे उल्लंघन झाल्यास सभापतींना कारवाई करण्याचा अधिकार आहे. काही सदस्य नियमांनुसार चर्चा करण्याऐवजी सभागृहात गोंधळ निर्माण करत आहेत. नियमांचे पालन केले नाही तर माइक बंद होतो आणि तसे होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.