कुस्तीत बजरंग व रवी यांना ऑलिम्पिकचे तिकीट

नूर सुलतान: महिलांमध्ये विनेश फोगटने ऑलिम्पिक फेरी निश्‍चित केल्यापाठोपाठ पुरूष गटात बजरंग पुनिया व रवी दहिया यांनीही ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्‍चित केले आहे. येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी आश्‍चर्यजनक निकाल नोंदवित उपांत्य फेरी गाठली आणि ही कामगिरी केली.

बजरंगने 65 किलो गटात पोलंडच्या क्रिझस्तोफ बिएन्कोवस्की याच्यावर 9-2 असा दणदणीत विजय मिळविला. पाठोपाठ त्याने स्लोवेनियाच्या डेव्हिड हॅबोटचा सहज पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याला कोरियन खेळाडू जोंग चोईसोन याचे आव्हान होते. ही कुस्ती त्याने 8-1 अशा फरकाने जिंकली.

रवीने 57 किलो गटातील पहिल्या दोन्ही लढती तांत्रिक गुणांच्या आधारे जिंकल्या. त्याने पहिल्या फेरीत कोरियाच्या सुंगक्वोन किमचा दणदणीत पराभव केला. पाठोपाठ त्याने अर्मेनियाचा युरोपियन विजेता खेळाडू आर्सेन हार्तुतुनियन याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. त्याने सुरूवातीच्या पिछाडीवरून ही कुस्ती जिंकली. या लढतीमधील शेवटच्या गुणाबाबत आर्सेनने आक्षेप घेतला. पंचांनी पुन्हा या कुस्तीचे चित्रीकरण पाहून रवीला दिलेला गुण बरोबर असल्याचा निर्णय दिला. उपांत्यपूर्व फेरीत रवीने माजी विजेता युकी ताकाहाशीला पराभवाचा धक्‍का दिला. ताकाहाशी हा त्याच्यापेक्षा अधिक बलवान होता. मात्र रवीने चापल्य दाखवित ही कुस्ती 6-1 अशा फरकाने जिंकली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.